मराठवाडा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा आखाडाच म्हणावे लागेल पण राजकारणाने अन इथल्या राजकारण्यांनी मराठवाड्याला फार काही दिले नाही. अस्मानी अन सुलतानी प्रश्नांना इथल्या लोकांनी नेटाने तोंड दिले, निजामाचे रझाकार असो वा दुष्काळाचे सावट..!! सगळ्या गोष्टींना पुरून उरला तो मराठवाडा. ही उर्जा, ही लढवय्ये वृत्ती आली कुठून ?? बहुतेक हि वृत्ती मराठवाड्याच्या सुवर्ण इतिहासातून आलेली असावी. आज मागास भाग म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा एकेकाळी भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध होता.

एक प्राचीन ग्रंथ आहे, त्या स्पार्टा अथेन्स वाल्या ग्रीक लोकांचा 'पेरीप्लस  ऑफ द अरीथ्रीयन सी' या ग्रंथात एक उल्लेख येतो, त्याचा सर्वसाधारण अनुवाद असा 'दक्षिणपथ या प्रदेशात दोन शहरांना प्रामुख्याने फार महत्व आहे, पैठण व तगर. पैठण हे साधारणपणे भरूच पासून २० दिवसांच्या प्रवासाने गाठता येते'. नाथमहाराजांचे पैठण जवळपास सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. तर तगर हे बहुतेक उस्मानाबाद जिल्ह्यामधले तेर हे गाव असावे.

तुम्हाला सातवाहन किंवा शालिवाहन राजे माहिती आहेत का? बहुतेक नसावेत. पण मुघालांनाही लाजवेल अस भलेमोठे साम्राज्य अन अरबांनी खाली पाहावे इतकी संपन्नता असलेले हे खूप मोठे साम्राज्य होते. त्या काळी एकदा शक(भारताबाहेरचे लोक) भारतावर चालून आले तेव्हा सातवाहन राजे त्यांना अंगावर घ्यायला हरयाणापर्यंत गेले अन त्यांना हाकलून लावले होते. (पानिपतच्या हजारो वर्ष आधी महाराष्ट्राने दिल्लीला तिच्या तलवारीची पाणी दाखवलं होत). तर या सातवाहनांची राजधानी होती पैठण (प्रतिष्ठान). एका अंदाजानुसार मध्ययुगीन भारताचा व्यापार हा जागतिक व्यापाराच्या ३७ टक्क्यांपेक्षा जास्त होता प्राचीन काळात तर तो अजून जास्त असेल. (आज चीन-अमेरिकेचे जे एकत्रित स्थान आहे तितके भारताचे त्याकाळी असावे). फक्त सातवाहनच नाही तर त्यानंतर कित्तेक शतके पैठण व्यापाराचे केंद्र होते, अल्लाउद्दिन खल्जीच्या आक्रमणाच्या वेळेपर्यंत म्हणजे जवळपास हजार वर्षे मराठवाड्यातली हि गांवे जागतिक व्यापाराची केंद्रे होती.

कोण कुठला टोलेमी त्यालासुद्धा हजारो किलोमीटर दूरवरची हि गांवे नावानिशी माहिती होती, त्याच्या दुसऱ्या शतकातील ग्रंथात यांचा स्पष्ट उल्लेख आहे. १९५८ साली नागपूर विद्यापीठाने भोकरधन इथे उत्खनन केले, यात शालिवाहन अवशेष तर मिळालेच पण त्याकाळची नाणी, धातूच्या वस्तू, शंखाच्या बांगड्या अन हस्तिदंती वस्तूही सापडल्या. 

यामध्ये सर्वाधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे एक अशी हस्तिदंती मूर्ती सापडली (बहुतेक लक्ष्मी) ज्या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती प्राचीन रोमच्या पोम्पाई नावाच्या शहरात सापडली होती. (पोम्पाई हे रोममधील खूप मोठे शहर एका ज्वालामुखीमुले नष्ट झाले होते).

१९३८ सालच्या इटलीमधील उत्खननात मूर्ती सापडली होती, तिला पोम्पेई लक्ष्मी या नावाने ओळखले जाते. त्याकाळी मराठवाडा अन इटली अर्थात प्राचीन रोमचा व्यापार होता होता अन तो फक्त आर्थिक पातळीवर राहिला नसून सांस्कृतिक आदानप्रदान होण्याइतका तो गाढ होता. उस्मानाबादेतल्या(धाराशिव म्हटले तर चालेल? कमेंट) तेर येथे रोमन लोकांची वसाहत असल्याचे पुरावे आहेत. आपल्या या दैदिप्यमान अशा इतिहासातून प्रेरणा घेत अनेक मराठवाडी लोक आज फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत आहेत. अन मराठवाडा आपले गतवैभव परत मिळवेल यात शंकाच नाही.


Post a Comment

Previous Post Next Post