तीन वेळा पंतप्रधान राहिलेलं अन भारतीय जनता पक्षाचे पहिले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील एक तेजस्वी सूर्य म्हणून सदैव स्मरणात राहतील. आज भारतीय जनता पक्षाचा सबंध भारतात बोलबाला आहे. पक्षाचे कार्यकर्ते तर चहाच्या टपऱ्यावर विरोधक कोण? अशा विचारणा हिररीने करतात. पण भारतीय जनता पक्षाचा हा प्रवास सोप्पा नवता, पक्षाचाच नव्हे तर या पक्षाचे भीष्म पितामह वाजपेयींचाही प्रवास वाटतो तितका सोप्पा नवता. पण आजचा लेख हा वाजपेयी यांना त्यांच्याच मतदार संघात जाऊन हरवणाऱ्या एका महिलेबद्दल आहे.

महाराष्ट्र भाजपात सध्या नाराजी नाट्य चालू आहे, एकनाथराव खडसे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले कि, ज्यावेळी पक्षात कुणीही येत नवते, पक्षाला हिणवलं जायचं त्यावेळी मुंढे-महाजन अन आपण पक्ष महाराष्ट्रात उभा केला. पण जेव्हा आपण इतिहास पाहतो त्यावेळी हे वाक्य मनोमन पटते. (PS-राजकारणात आम्ही कुणाचेही पक्षधर नाही आहोत)

१९६२ च्या लोकसभेच्या निवडणुका होत्या, आत्ताचा भाजप तेव्हा जनसंघ होता अन या जनसंघाचे एक मोठे नेते होते अटल बिहारी वाजपेयी, वाजपेयींचा उत्तर प्रदेशातल्या बलरामपूर मतदारसंघात फार दबदबा अन यावेळी ते निवडून येतील अशी शक्यताही होती, पण अशात आज जवळपास कुणालाही माहिती नसणाऱ्या एका महेलेने त्यांचा पराभव केला, त्या महिलेचे नाव होते सुभद्रा जोशी.

सुभद्रा या १९५१ ला कर्नाल तर १९५७ ला अंबाला इथून खासदारकीची निवडणूक जिंकल्या होत्या. बलरामपुराशी त्यांचा म्हणावा तसा संबंध नवता याउलट वाजपेयींचे तिथे चांगले प्रस्थ होते तरीही जोशी यांनी वाजपेयींना मात दिली. बलराज सैनी या अभिनेत्याने सुभद्रा जोशी यांचा प्रचार केला होता. (जशी भाजपची प्रचारयंत्रणा सध्या अभेद्य वाटते तशीच त्याकाळी कॉंग्रेसची होती)

पण सुभद्रा जोशींना फक्त वाजपेयींना हरवणारी महिला म्हणून लक्षात ठेवणे हे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. महाविद्यालयात शिकत असतानाच त्या भारतीय स्वतंत्रता संग्रामात सामील झाल्या. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्या अरुणा असफ अली यांच्या खांद्याला खांदा लावून ब्रिटीशांच्या पुढे उभ्या ठाकल्या होत्या. 'हमारा संग्राम' नावाच्या नियतकालीकाच्या संपादक म्हणून त्यांनी ब्रिटीश सरकारवर ताशेरे ओढले होते. फाळणीच्या हिंसक काळी त्यांनी 'शांती दल' नावाची संस्था काढून लोकांची मदत केली होती.

स्वातंत्र्यानंतरही या महान महिलेचे कार्य सुरूच राहिले, अशात १९६१ साली सागर या मध्य प्रदेशातील जिल्यात धार्मिक दंगल उसळली. सुभद्रा जोशी कोणताही लवाजमा न घेता सरळ तिथे गेल्या अन दंगल शांत करूनच परत आल्या. संजय गांधीच्या मनमर्जीपणाविषयी त्यांनी इंदिरा गांधींना तक्रार केली होती. शीख दंगलीच्या वेळीही त्यांनी पक्षावर टीका केली होती. पण हळूहळू राजकारणाचे फासे बदलले त्यांच्यावर विरोधकांकडून रशियन एजेंट असल्याची वारंवार टीका आरोप केले गेले. शेवटी कंटाळून त्यांनी राजकीय सन्यास घेतलं. २००३ मध्ये त्यांचे निधन झाले.

Post a Comment

Previous Post Next Post