सहसा वयाच्या मध्यार्धा पर्यंत तरुण तरुणी एक प्रकारे शांत पडतात, त्यांचे गरम रक्त थंड पडते अन स्वप्नांच्या मागे धावायचे ते थांबतात. पण एक म्हातारी आहे, आज्जीबाईच म्हणा कि, तब्बल ८३ वर्षांच्या या अज्जींची मुले व्यवस्थित शिकली नोकरीला लागली पण या बाईंनी आपल्या स्वप्नामागे धावायचे सोडले नाही अन या वयातही त्या स्वतःचे हॉटेल चालवत आहेत, अन हे हॉटेल अख्ख्या नाशिकमध्ये प्रसिद्ध आहे.
नाशिकची मिसळ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. पण नाशिकमध्ये सगळ्यात भारी मिसळ कुणाची मिळते माहितीये? तर हि मिसळ मिळते वय वर्ष ८३ असलेल्या सीताबाई यांच्या हॉटेलमध्ये. सिताबाईची मिसळ म्हटले कि भद्रकाली आणि पंचवटी परिसरातला कोणताही माणूस तुम्हाला त्यांच्या हॉटेलमध्ये घेऊन जाईल
या मिसळीची कहाणीही फार जुनी अन संघर्षपूर्ण आहे. स्वातंत्र्यापूर्वी लग्ना नंतर सीताबाई यांच्या पतीला एका आजाराने ग्रासले अन यामुळे त्यांच्या शरीराची प्रचंड लाहीलाही व्हायची त्यामुळे ते काम करू शकत नवते. अशातच त्यांचा मृत्यूही झाला. आपल्यामागे त्याने तीन मुली अन एक मुलगा सोडला होता घराची सगळी जबाबदारी सीताबाई यांच्यावर पडली.
मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सीताबाईवर असल्याने त्यांनी मुलांना सांभाळत असताना दुध व्यवसाय केला आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी मुलांचे शिक्षण केले. अशातच त्यांनी एक हॉटेलही सुरु केले. सुरवातीला इथली शेव लोकांना खूप आवडायला लागली मग त्यांनी मिसळही सुरु केली अन मिसळतर त्यांच्या शेवपेक्षाही प्रसिद्ध झाली. सीताबाई रोज पाचला उठून अकरापर्यंत हॉटेल चालवतात आणि मग; घरकाम करून पुन्हा संध्याकाळी व्यवसाय करतात. सीताबाई त्यांचा दिनक्रम गेली पन्नास वर्ष चालवत आहेत. त्यांचा एक मुलगा महापालिकेत नोकरीला आहे तर एक मुलगी नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये काम करते.
आजही सीताबाई कुणालाही हाताशी न घेता त्या या वयात स्वतः गरम तेलात शेव काढण्याचं काम करतात. जबाबदारीचं भान आजही त्यांचे हात थरथरु देत नाहीत. मिसळीची चव जशी सुरवातीला होती आज ही तशीच आहे. कधी नाशिकला गेलात तर नाशिकच्या या दंडकारण्यातील सीतेला नक्की भेट द्या आणि सीताबाईच्या मिसळीची चव एकदा चाखून तर पहा.
Post a Comment